पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकाबाकी तब्बल साडेआठ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. सुमारे 5 लाख 70 हजार मिळकतींची ही थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा आकडा वाढतच आहे. दरम्यान, महापालिकेचे एकूण 12 लाख 25 हजार मिळकतधारक असून त्यातील सव्वा सात लाख करधारकांनी आतापर्यंत 1,300 कोटींचा कर जमा केला आहे. मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी मनपा प्रशासनाने 2021, 2022 मध्ये सलग दोन वेळा अभय योजना राबवली. यात, सुमारे 700 कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले. त्यानंतर सभागृहाची मुदत संपल्याने प्रशासनाने अभय योजना बंद केली. त्यानंतर ही योजना पुन्हा लागू केली जाईल, या आशेवर अनेकांनी पुन्हा थकबाकी ठेवली आहे. थकबाकीदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी करसंकलन विभागाकडून प्रयत्न केले केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेत न्यायालयातीन दावे तसेच ते निकाली काढण्यासाठी उपाय योजनांचा आराखडा केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा हे काम बारगळले असल्याचे चित्र आहे. स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज कर थकवणाऱ्यांना न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यापासून ते व्यावसायिक मालमत्तांना टाळे (सील करणे) ठोकण्यापर्यंतची कारवाई महापालिका करत आहे. तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून थकबाकीची अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यावरही प्रशासन भर देत आहेत. मात्र, त्यानंतरही थकबाकी कायम राहत असल्याने वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.