आचार्य गुप्तीनंद महाराज; जैन बोर्डिंग व्यवहार दोन दिवसांत रद्द करा पुणे – मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग जमीन विक्री व्यवहार (सेल डीड) दोन दिवसात रद्द झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण करणार असल्याचा घोषणा जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली. जैन बोर्डिंग जमिनीचा विक्री व्यवहार रद्द व्हावा यासाठी जैन समाजाने आंदोलने केली. मुंबईतील राज्य धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्याकडे याचिका दाखल करुन दादही मागितली होती. गोखले बिल्डर व जैन बोर्डिंग ट्र्स्टींनी व्यवहार रद्द करण्याबाबत सहमती दर्शवित त्याबाबत दोघांचे संयुक्त प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी ३० ऑक्टोबरला सुनावणी घेऊन निर्णय दिला होता. त्यात विक्रीखत व पॉवर ऑफ अटर्नी रद्द करून मालमत्ता पुन्हा ट्रस्टच्या नावावर नोंदविण्याचे निर्देश दिले होते. ट्रस्टने विक्रीतून मिळालेली रक्कम टीडीएस कमी करुन बिल्डरला परत करण्याचे बंधनही घातले आहे. गुप्तीनंद महाराज म्हणाले, धर्मादाय आयुक्तांनी जमीन विक्री व्यवहार रद्द करण्याचे आदेश देवून १३ दिवस झाले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सिव्हील कोर्टात बिल्डर व ट्र्स्टने जमीन विक्री व्यवहार रद्द करण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. हा केवळ न्यायालयाचा आणि धमार्दाय आयुक्तांच्या आदेशाचा अपमान नाही तर राज्य सरकारचाही अपमान आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून या विषय संपवून जैन समाज बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणीही आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी केली आहे. दोन दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अहिल्यानगर येथील जैन समाजाला दान केलेल्या जमीनीवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. ही जमीन जैन समाजाला मिळावी. शहर सुशोभिकरण्याच्या नावाखाली दिल्ली, पंढरपुर, इंदोरमधील जैन समाजाच्या मंदिरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.