Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने सादर केलेल्या वासंतिक उटी भजनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. शुक्रवारी (दि. १६) संकष्टी चतुर्थीनिमित्त वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन केले होते.
या सोहळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून श्रींच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो. त्यानुसार भाविकांकडून श्रींच्या मूर्तीला चंदन, गुलाबजल, अत्तर, केशर, गंधा या मिश्रणाचा लेप लावण्यात आला होता. संपूर्ण मंदिर परिसर मोगऱ्यासह इतर फुलांनी सजवण्यात आले. चंदन आणि मोगऱ्याचा सुगंध परिसरात पसरला होता.
यावेळी भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने भजनसेवा करण्यात आली. त्यांच्या सुश्राव्य भजनाच्या स्वरांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





