Pune : १७ वर्षीय तरुणीचे अवयवदान

पुणे : नारायणगाव येथे झालेल्या एका भयानक रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या एका १७ वर्षीय तरुणीने अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवले.
नुकताच २५ जानेवारी रोजी तिने तिचा १७ वा वाढदिवस साजरा केला होता. तिचा अपघात झाल्यावर तिच्या पालकांनी तिला स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र, तेथून बाणेर येथील मोठ्या खासगी रुग्णालयात तिला हलविण्यात आले. मात्र, तेथे तिला मेंदू मृत घोषित करण्यात आले.
तिच्या पालकांनी झेडटीसीसीच्या सदस्यांच्या मदतीने तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. तिचे दोन्ही मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. २९ जानेवारी रोजी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बाणेर येथे मणिपाल रुग्णालयात एका ३९ वर्षीय महिलेला तिची किडनी देण्यात आली, तर दुसरी किडनी ही ज्युपिटर रुग्णालयात ३७ वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आली.
डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पाच वर्षांच्या मुलाला यकृताचा काही भाग दिला, तर ४३ वर्षाच्या इसमाला दुसरा भाग दिला. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये ३३ वर्षीय महिलेला फुफ्फुस देण्यात आले.





