पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात ९१ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांपैकी केवळ १५ दवाखाने सुरू झालेत. त्यामुळे उर्वरित आपला दवाखाने तत्काळ सुरू करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची सद्यःस्थिती आणि त्यासाठीच्या निधी उपलब्धतेबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य विभागाकडून आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. स्वनील नाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, सहायक संचालक डॉ. दीप्ती देशमुख, विशेष कार्य अधिकारी प्रशांत पिसाळ उपस्थित होते. राज्यातील विविध शहरांमध्ये गोरगरीब नागरिकांच्या सेवेसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचे शासनाचे निर्देश असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ९१ दवाखान्यांपैकी केवळ पुणे महानगरपालिकेअंतर्गत आठ आणि पिंपरी-चिंचवडमधील सात दवाखाने सुरू झाले. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत, तत्काळ उर्वरित दवाखाने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्यावी. महापालिकेने प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन सद्यःस्थिती कळवावी. ज्या ठिकाणी नागरिकांचा विरोध होत असेल तेथे जनसुनावणी घेऊन जागा निश्चित करावी आणि दवाखाने कार्यान्वित करावेत. दि. २५ मे पासून शासनाचा आरोग्य विभाग, मनपा व सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने आरोग्य शिबिरे या ठिकाणी घेण्याचे नियोजित असून महिलांची रक्त तपासणी, कॅल्शियम व लोह कमतरता तपासून औषध वाटप इत्यादी आरोग्य सुविधांवर भर देण्यात यावा, असे निर्देश डाॅ. गोऱ्हे यांनी दिले.