पुणे : वानवडी पोलिसांनी घोड्यांच्या रेसवर ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ५५ हजारांचे जुगारासाठी वापरलेले मोबाइल आणि बुक जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये पिता- पुत्राचा समावेश आहे. मेहमूद इब्राहिम शेख, फैज मेहमूद शेख (२९, दोघेही रा. फातिमानगर), चांद शमशुद्दीन शेख (२९, रा. वानवडी, पुणे), अकबर अन्वर खशन (४६, रा. कॅम्प) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्यावर वानवडी पाेलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पाेलीस श्री रामनवमीचा बंदाेबस्त करत असताना खबर मिळाली, की रेसकाेर्स मुंबई येथे चालू असलेल्या रेसवर दाेन जण वानवडी भागात ऑनलाइन जुगार घेत आहेत. त्यानुसार पाेलीस उपनिरीक्षक धनाजी टाेणे यांच्या पथकाने फातिमानगर चाैकातील बालाजी दर्शन या इमारतीतील एका सदनिकेमध्ये पाहणी केली. तेथे आरोपी बेटिंग घेताना आढळून आले. मेहमूद शेख हा मुंबई येथून सर्व गाेष्टी कंट्राेल करून बेटिंग घेत होता. फैज मेहमूद शेख याने सांगितले, की हे घर त्याचे वडील मेहमूद इब्राहीम शेख यांचे असून, त्यांच्याकडे ग्राहक रेसकाेर्सच्या घाेड्यांवर जुगार लावतात. त्यानुसार आम्ही हा सर्व व्यवहार फाेनद्वारे करताे. यामुळे मेहमूद शेखलाही अटक करण्यात आली.