Pune: गुंडाळलेल्या योजनेचा ऑनलाइन गोंधळ

पुणे – महापालिका आणि स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहरातील नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून जवळच्या अंतरासाठी सायकल वापरावी, या उद्देशाने सायकल योजना राबविण्यात आली. त्यासाठी चार खासगी कंपन्यांनी शहरभर जवळपास १० हजार सायकली उपलब्ध करूनही दिल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये सुरू झालेली ही योजना २०२० मध्येच दोन्ही यंत्रणांनी गुंडाळली असून, शहरात एकही सायकल उपलब्ध नाही.
त्यानंतरही ही योजना सुरू असून, सायकल हवी असल्यास त्याची माहिती ऑनलाइन शोधा, असे अजब उत्तर पुणे स्मार्ट सिटीकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत देण्यात येत आहे. ही योजना कुठे सुरू आहे?, किती सायकल उपलब्ध आहेत, याची माहिती सामाजिक कार्यकर्ते परेश खांडके यांनी विचारली होती. त्यावर स्मार्ट सिटीकडून हे उत्तर देण्यात आले आहेत.
पर्यावरण संवर्धनाचे कारण देत महापालिकेकडून शहरात ही सायकल योजना प्रस्तावित केली होती. ती स्मार्ट सिटी चालविणार की महापालिका, यावरून प्रशासकीय वादही झाले. त्यानंतर शहरात एक लाख सायकल, ८ हजार सायकल स्थानके, ५३१ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग, ३१ किलोमीटरचा हरित मार्ग असे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एका ठिकाणावरून सायकल घेतल्यानंतर ती दुसऱ्या स्थानकावर सोडता येत होती, तसेच त्यासाठी शुल्क आकारले जात होते.
पहिल्या टप्प्यात पुण्यात सुमारे तीन हजार सायकल दाखल झाल्या होत्या. या योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला; पण काही काळानंतर सायकल खराब होणे, त्यांची मोडतोड होणे, चोरीला जाणे असे अनेक प्रकार घडू लागले. त्यामुळे ही योजना २०१९ च्या सुमारास बंद पडली.
सध्या शहरात एकही सायकल अस्तित्वात नाही. असे असतानाही प्रशासनाकडून ही योजना सुरू असून, त्याची माहिती ऑनलाइन मिळेल, असे आश्चर्यकारक उत्तर देण्यात आले आहे. या योजनेबाबत माहिती मागवली असता, मला ती ऑनलाइन बघा, असे उत्तर देण्यात आले; पण ही योजना बंद पडूनही स्मार्ट सिटीकडून अशा पद्धतीने देऊन ही योजना ऑनलाइन जिवंत ठेवली असल्याची टीका खांडके यांंनी केली आहे.





