आठवड्यात किलोमागे १२ रुपयांनी वाढ परदेशासह देशातून मागणी वाढल्याचा परिणाम पुणे – बांगलादेशने वाढवलेली आयात, श्रीलंकेसह दक्षिण भारतातून वाढलेली मागणी, संपत चाललेला जुन्या मालाचा साठा, आकाराने लहान असलेला नवीन माल या सर्व परिस्थितीतीमुळे कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आठवडाभरात कांदाच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे १२ रुपयांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात बुधवारी (दि. १०) १० ते १५ रुपये भाव मिळणाऱ्या कांद्यास मंगळवारी (दि. १६) ११ ते २७ रुपये भाव मिळाला. बाजारात मुबलक माल उपलब्ध असल्याने एप्रिल महिन्यापासून कांद्याला कमी भाव मिळत होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. बांगलादेशात कमी प्रमाणात येथून माल जात होता. मात्र, त्यांनी आता आयात वाढवलेली आहे. श्रीलंका आणि दक्षिण भारतातून मागणी वाढली आहे. त्यातच जुन्या कांद्याचा साठा संपण्याचा मार्गावर आहे. लांबलेल्या पावसाचा परिणाम नवीन कांद्यावर झाला आहे. उत्पादन घटण्याबरोबरच कांद्याचा आकार लहान आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. येथील बाजारात पारनेर, श्रीगोंदासह अहिल्यानगर जिल्ह्यांतून आणि जिल्ह्यातील आंबेगाव भागातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. जुन्या कांद्याची मागील आठवड्यात १२० ते १३० गाड्या आवक होत होती. त्यामध्ये घट झाली आहे. आता ती घटून १०० ट्र्कपर्यंत आली आहे. नवीन कांद्याची तुरळक आवक होत आहे. घाऊक बाजारात नवीन कांद्यास किलोस दर्जानुसार १० ते २५ रुपये भाव मिळाला. मागील ८ महिन्यांपासून कांद्याला कमी भाव मिळत आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ख्रिसमस, ३१ डिसेंबरच्या पार्टीसह पर्यटनास गेलेल्या नागरिकांमुळे हॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याला मागणी जास्त असते. त्यामुळे पुढील कालावधीत भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. – राम नरवडे, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड