Pune : आता तुम्हीच उद्घाटनाला या
पुणे : बाणेर येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्र प्रकल्पाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, प्रकल्पाच्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा असल्याने भूमीपूजन रखडले होते. त्यामुळे, महापालिकेने तत्काळ परिसर साफ न केल्यास आयुक्तांची सेवानिवृत्तीपूर्वी बदली करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिला होता.
आता, या प्रकल्पाच्या भूमीपूजनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. महापालिका आयुक्तांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भूमीपूजनासाठी वेळ मागितली आहे. यामुळे अजित पवारांनाही शह दिल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
बाणेर येथे टाटा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १६५ कोटी रुपये खर्चून कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर बांधकाम व्यावसायिकांनी टाकलेला राडारोडा हटवण्याची मागणी टाटा समूहाने केली होती.
याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर तीन दिवसांत महापालिकेने युद्धपातळीवर काम करीत जागेवरील राडारोडा हटवला.
…त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आग्रह
या केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी कोणाच्या हस्ते करायचे, यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाला निमंत्रण दिल्यास दुसऱ्याची नाराजी ओढवू शकते, यामुळे महापालिका अडचणीत सापडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता या प्रकल्पाचे भूमीपूजन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले आहे.





