पुणे – महापालिकेची प्रभाग रचना आणि त्यानंतर प्रारूप मतदार यादीत प्रभागांची मोडतोड झाल्यानंतर भाजप वगळता इतर जवळपास सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढविण्याची संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर आता उमेदवारी मिळाल्याने, तसेच भाजप मध्ये नाराजांची मोठी फळी असल्याने या फळीला सोबत घेऊन शहरातील अनेक प्रभागांमध्ये क्राॅस व्होटिंगसाठी फिल्डिंग लावली जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चार सदस्यांमध्ये एक- दोन उमेदवार नवीन असल्याने प्रस्थापित उमेदवारांवर ताण येणार आहे. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांची मदत घेत तुम्हाला निवडून देतो. आम्हाला मदत करा, असे आश्वासन देत व्युहरचना केली जात आहे. २०१२ मध्ये दोन सदस्यांचा प्रभाग असताना, तसेच २०१७ मध्ये चार सदस्यांचा प्रभाग असताना अनेक ठिकाणी क्राॅस व्होटिंग झाले होते. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात १६५ जागा असून, चार सदस्यांच्या प्रभागात या निवडणुका होत आहेत. जवळपास तीन वर्षे उशिराने या निवडणुका होत असल्याने मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्ते इच्छुक होते, तर अनेक माजी नगरसेवकांनी प्रभागातील इतर सक्षम कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकांची तयारी केली होती. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून २०१७ मधील सुमारे ३२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली आहे, तर दुसरीकडे इतर पक्षांतील सुमारे २२ ते २५ जणांना पक्षात प्रवेश देत उमेवारी देण्यात आली आहे. त्यातच काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र असून, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. शिवसेना स्वबळावर लढत असून, आपही मैदानात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडे नाराजांचा भरणा असल्याचे दिसून येत आहे. या नाराजांना विरोधी पक्षांकडून खतपाणी घातले असून, निवडून येण्यासाठी समोरच्या प्रभागातील माजी नगरसेवकांना साकडे घातले जात आहे. ज्या प्रभागात आपल्याला जास्त मते मिळतील, तिथे तुम्हाला चालवतो. तुमच्या प्रभागात अंतर्गत यंत्रणेद्वारे आम्हाला चालवा, असे निरोप जुन्या मित्रांना दिले जात आहेत. त्यामुळे नवीन उमेवार गोंधळात असून, क्राॅस व्होटिंग झाल्यास त्यांना मोठा फटका बसणार आहे. रणनीतीचा फटका बसणार? २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत सुमारे १० ते १२ प्रभागांमध्ये क्राॅस व्होटिंग झाले होते, तर २०१२ मध्ये दोन सदस्यांच्या प्रभाग पद्धतीत हा आकडा २५ पेक्षाही अधिक होता. त्यात भाजप- राष्ट्रवादी, मनसे – राष्ट्रवादी, शिवसेना- राष्ट्रवादी असे उमेदवार निवडून आले होते. तीच रणनीती काही नगरसेवक आखत असून, तसेच झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.