दुबार कामे लक्षात येणार, प्रत्येक कामाची तपासणी होणार पुणे : महापालिकेने शहरात खड्डेमुक्त अभियान सुरू केले असून नोव्हेंबर अखेर सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेतील कामांची नोंदणी आता गुगल मॅपवरील जीआयएस प्रणालीमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामाची तपासणी प्रशासनास सोयीस्कर होणार असून दुबार कामे सहज लक्षात येणार आहेत. तसेच दोषदायित्व कालावधीत ही कामे पुन्हा खराब झाल्यास त्याची पडताळणी करणेही शक्य होणार आहे. मोहिमेत प्रत्येक कामाचे अक्षांश-रेखांश, कामाची तारीख, एकाच अँगलने घेतलेले कामाचे आधी आणि नंतरचे फोटो, केलेल्या कामाची माहिती, रस्त्याचे नाव, रुंदी, लांबी या सर्व बाबींची नोंद एका क्लिकमध्ये प्रशासनास उपलब्ध होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच अभियंत्यांनी ही माहिती दररोज काम पूर्ण झाल्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत भरावी, असे बंधनकारक केले आहे. पालिका खड्डेमुक्त अभियान राबवत असून शहराच्या विविध भागांत वेगवेगळ्या ठेकेदारांची नियुक्ती केलेली आहे. प्रशासनाने कोणतीही निविदा न काढता ही कामे करत असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांनी बीले प्रशासनास सादर करावी लागतील. त्यामुळे काम नेमके कधी आणि कुठे झाले याची अचूक नोंद आवश्यक आहे. त्याची थेट जीआयएस लेयरवर नोंद होणार आहे. भविष्यात पुन्हा रस्ते खराब झाल्यास त्यानुसार आवश्यक ती उपाययोजना करणे प्रशासनास शक्य होणार आहे. नोंदणी झाल्यानंतर उपअभियंत्यांनी १०० टक्के कामांची पडताळणी करणे, अधिक्षक अभियंत्यांनी ४० टक्के तपासणी करणे आणि मुख्य अभियंत्यांनी १० टक्के कामांची तपासणी करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. पालिका वर्षभर खड्डे दुरूस्ती, रस्त्यांची कामे करते. मात्र, त्याच्या कोणत्याही नोंदी एका जागी नसतात. त्यामुळे कोणते काम कधी आणि कोणी केले ही माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत नाही. आता यापुढे खड्डेमुक्त मोहीम तसेच रस्ते दुरूस्तीची माहिती जीआयएसच्या लेअरवर केली जाणार आहे. – ओम प्रकाश दिवटे ( अतिरिक्त महापालिका आयुक्त)