पुणे – शहरातील मिठाई दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने 35 दुकानदारांना नोटीस बजावल्या आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर यामध्ये दोषी आढळणाऱ्यांना दुकानदारांना एक लाखापर्यंत दंडाची कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले. मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकणे, कच्चे अन्न पदार्थ व खवा हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करणे, प्रत्येक अन्न व्यावसायिकाने त्यांचे विक्री बिलावर अन्न सुरक्षा व कायद्याअंतर्गत प्राप्त परवाना अथवा नोंदणी क्रमांक नमूद करणे, अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित साठवणूक करणे, कामगारांची त्वचा संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबतची तपासणी करणे, मिठाई ही 8 ते 10 तासांच्या आत खाण्याबाबत बॉक्सवर सूचना देणे, लसीकरण करणे, आदी सूचना प्रशासनाने दिल्या होतय.