Pune : नालेसफाईत हलगर्जीपणा नको; केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या महापालिकेला सूचना

पुणे : शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड मागील काही वर्षांत दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देत मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे.
तसेच, ठेकेदार किंवा अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही सूचना केल्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला.
मोहोळ म्हणाले की, चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याचे सूचना मनपाला दिल्या आहे. पुण्यात एकूण ८७५ कि.मी.चे नाले आहे. याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल.
नालेसफाईचे यावर्षी २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहेत. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करीत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.





