Pune : बायोमेट्रिक हजेरी नाही, तर वेतनही नाही

पुणे : आयुक्तांनी वारंवार सूचना देऊनही महापालिकेतील अनेक अधिकारी तसेच कर्मचारी कामाच्या वेळेत कार्यालयातून गायब असतात. त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या पुढे महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीनुसारच दिले जाणार आहे.
अनेक कर्मचारी सकाळी महापालिका मुख्यालयात उशिरा येतात, तर काही जण कामाची वेळ संपण्याआधीच गायब होतात. या बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले. तसेच, बायोमेट्रिक हजेरी न तपासताच वेतन दिले गेल्याचे आढळल्यास संबंधित विभाग प्रमुखावरही कारवाई केली जाणार आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांसाठीही पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ ही वेळ निश्चित आहे. जेवणासाठी दुपारी २ ते २.३० ही वेळ आहे. मात्र, अनेक जण कार्यालयात सकाळी ११ वाजेपर्यंत येतात, तर सायंकाळी साडेपाच वाजताच जातात. हे कर्मचारी बायोमेट्रिक नोंद न करता हजेरी पुस्तकात सह्या करतात.
या पुस्तकानुसार उपस्थिती गृहीत धरून वेतन काढले जाते. मात्र, यापुढे बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करूनच वेतन दिले जाणार आहे.





