Pune : जीबीएसचे रुग्ण दूषित पाण्यामुळेच एनआयव्हीच्या अहवालात खुलासा

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदेडगाव, धायरी परिसरात गुलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण होण्यास दूषित पाणी हेच प्रमुख कारण असल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एनआयव्ही) अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, महापालिकेने तातडीने या भागात शुध्द पाण्याचा पुरवठा रुरू करावा अशा सूचनाही या अहवालात करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या आजाराबाबत अभ्यास तसेच तपासण्या करण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालये सहकार्य करत नसल्याने महापालिकेने या रुग्णालयांनी एनआयव्हीला सहकार्य करवे, अशा सूचना द्याव्यात असेही महापालिकेस सांगण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त म्हणाले. महापालिका, एनआयव्हीचे अधिकारी, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांची बुधवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत एनआयव्हीकडून हा अहवाल महापालिकेस देण्यात आला.
रुग्ण संख्या वाढण्यावर होणार संशोधन
या बैठकीत एनआयव्हीकडून आणखी संशोधन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शहरात या पूर्वीही जीबीएसचे रुग्ण वर्षभर आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. मात्र, आता अचानक रुग्ण वाढले कसे? याबाबत एनआयव्हीकडून आणखी संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी आणखी चाचण्या करणे गरजेचे असल्याने महापालिकेने पाण्याचे नमुने १०० मिलिलीटर ऐवजी दोन लिटर इतके घ्यावे व ते दीर्घकाळ साठवून ठेवावे, अशा सूचना एनआयव्हीने केल्या आहेत. याशिवाय नागरिकांच्या घरापर्यंत पाणी देताना त्यात क्लोरिनचे प्रमाण किमान ०.३ पीपीएम असणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.
खासगी रुग्णालयांचा असहकार
जीबीएसची लागण झालेले काही रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. एनआयव्हीतर्फे या रुग्णांची भेट घेऊन काही नमुने गोळा केले जात आहेत. मात्र, काही रुग्णालयांकडून सहकार्य केले जात नसल्याची तक्रार एनआयव्हीने केली आहे. या आजाराच्या कारणांचा तसेच भविष्यात त्याला प्रतिबंध करण्यासाठी रुग्णांची माहिती, तसेच इतर काही तपासण्या आवश्यक आहेत. त्यासाठी एनआयव्हीचे कर्मचारी रुग्णालयात गेले असता त्यांना माहिती देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे, महापालिकेने या सर्व रुग्णालयांना एनआयव्हीला सहकार्य करण्याच्या सूचना तातडीने केल्या आहेत. महापालिकेने केलेले सर्वेक्षण एनआयव्हीच्या सूचनांप्रमाणे झालेले नाही. परिणामी, महापालिकेने पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे, तसेच आणखी माहिती आणि नमुने संकलीत करावेत, अशा सूचनाही पालिकेस करण्यात आल्या असल्यचे यावेळी सांगण्यात आले.





