पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारच मिळत नाही. या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांचा समावेश आहे. तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने दि. १५ एप्रिलला पुणे जिल्हा परिषद कार्यालयात एक दिवस धरणे आंदोलन करण्यात येण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत तब्बल २ हजार २०० कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आणि इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये विशेष डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी आणि सामुदायिक वैद्यकीय अधिकारी यांसह कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. याबाबत पुणे जिल्ह्यातील एनएमएच कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हर्षल रणवरे यांनी सांगितले की, संघटनेने याबाबत पुणे जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे. या एक दिवसाच्या संपात पुणे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी ९ ते १४ एप्रिल दरम्यान काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. आजपर्यंत (१४ एप्रिल) प्रलंबित वेतन न मिळाल्याने आम्ही १५ एप्रिलला पुणे जिल्हा परिषदेसमोर धरणे करणार आहे. आम्हाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार मिळालेला नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून पगार वेळेवर मिळत नाही.