Pune News : सिंहगडावरून परत येत असताना दुचाकीचा ब्रेक निकामी झाल्यामुळे तरूण-तरूणी दरीत कोसळले. दोघेही गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२३) सकाळी ही घटना घडली. पूजा चव्हाण आणि सौरव साळुंखे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघे सिंहगडावर फिरायला गेले होते. त्यानंतर दुचाकीवरून परत येत होते. त्यावेळी दुचाकीचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे ११ हजार पॉईंट येथून दोघे खोल दरीत दोघे कोसळले. घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी समाधान पाटील यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिली. जखमींना त्वरित मदतीची गरज असल्याने हवेली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली. वनविभाग, वन समितीचे कर्मचारी शांताराम लांगे व सहकारी, स्थानिक नागरिक, पर्यटक आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने दोघांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले. पूजा चव्हाण हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक माहितीनुसार पायाला दोन ते तीन ठिकाणी फ्रॅक्चरआहे. सौरव साळुंखे याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून नाक, कानातून रक्तस्त्राव सुरू होता. परिस्थिती गंभीर असल्याने १०८ ॲम्बुलन्सला माहिती देण्यात आली. मात्र विलंब होत असल्याने हवेली आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू स्कॉर्पिओ वाहनातून दोघांना उपचारासाठी नेले. नातेवाईकांना माहिती देऊन त्यांच्या विनंतीनुसार दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंहगड घाट परिसरातील धोकादायक वळणांमुळे वाहन चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.