प्रभात वृत्तससेवा पुणे – ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कार्यकर्ते, ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्रथम प्राचार्य, संत्रिका विभागाचे मार्गदर्शक यशवंतराव शंकर लेले यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.लेले यांचे पार्थिव सोमवारी (८ डिसें.) सकाळी सेनापती बापट रस्त्यावरील निवासस्थानी, त्यानंतर ज्ञान प्रबोधिनीतील उपासना मंदिरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.१९३० मध्ये मिरज येथे जन्मलेल्या यशवंतराव यांचे शालेय शिक्षण वाई येथे झाले. १९४८ मध्ये ते पुण्यात आले. त्यांचे वडील सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख होते. मात्र, मित्रांमुळे यशवंतरावांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करतानाच त्यांनी बीए, बीटी आणि एमए पूर्ण केले. १९५० दरम्यानच्या संघबंदीविरोधातील सत्याग्रहात सहभागाबद्दल त्यांना काही महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता.निश्चयाने ते शिक्षक बनले. काही काळ अन्य शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यावर त्यांनी नोकरी सोडून अप्पा पेंडसे यांच्यासवेत पूर्णपणे ज्ञान प्रबोधिनीला वाहून घेतले. ईशान्येकडील राज्यांच्या अभ्यास दौऱ्यात आणि सामाजिक कार्यात ते सक्रीय होते. डॉ. भीमराव गस्तींच्या मदतीने बेरड-रामोशी समाजाच्या आणि देवदासींच्या प्रश्नांवरही त्यांनी काम केले. त्यांचे अनेक लेख संत्रिकेच्या माध्यमातून प्रकाशित झाले. अखेरपर्यंत ते ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते.