Pune News : एका खासगी लॅबच्या चुकीच्या हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टमुळे महिलेच्या जीवाशी खेळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीने लॅब टेक्निशियन, तज्ञ डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अजित रेवणसिद्ध तुरबे (२६, रा. सिद्धार्थनगर, रामवाडी, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी रेणुका तुरबे यांना एप्रिल २०२५ मध्ये पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांनी खराडीतील हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना रामवाडीतील खासगी नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. विविध तपासण्या आणि एक्स रेनंतर पोटातील गाठ गर्भाशयाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर काढलेल्या गाठीचा नमुना ढोले पाटील रोड येथील मेघा व्हिजन लॅबमध्ये तपासणीस पाठविला. त्यांच्या रिपोर्टमध्ये ती गाठ चरबीची व गर्भाशयाशी संबंधित असल्याचे नमूद केले. तीन महिन्यांनी पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर सोलापूर येथील रुग्णालयात तपासणी केली असता त्याच ठिकाणी गाठ पुन्हा आढळली. तसेच पुर्वीच्या गाठीचा नमुना पुन्हा तपासल्यानंतर पहिली गाठ कॅन्सरचीच असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पहिला रिपोर्ट चुकीचा असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी डॉक्टर, लॅबकडे जाब विचारला. मात्र, डॉक्टरांनी लॅबची चूक असल्याचे सांगितले, तर लॅबने डॉक्टरांवर जबाबदारी ढकलली. दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्याकडून अभिप्राय मागवला. २२ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अहवालात मेघा व्हिजन लॅबकडून हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट देताना निष्काळजीपणा झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार लॅबवर गुन्हा दाखल केला. चुकीच्या रिपोर्टमुळे उपचारात विलंब झाला असून पत्नीच्या उपचारांसाठी आतापर्यंत ९ लाख रुपये खर्च झाले. उपचारासाठी कर्ज, हातउसने पैसे आणि दागिने गहाण ठेवण्याची वेळ आल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.