पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे शनिवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे १०० वीजग्रा्हकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये दोन सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने १५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला असून खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शक्यता गृहित धरुन स्वत: सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे.