कापुरहोळ : भोर तालुक्यातील हरीश्चंद्री गावच्या हद्दीतील श्रद्धा हॉटेलमध्ये 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजूर महिलेच्या दोन वर्षांच्या मुलीवर भट्टीची गरम राख पडल्याने ती गंभीररित्या भाजली गेली. या प्रकरणी हॉटेल मॅनेजरविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपाली युवराज जाधव (वय 35, रा. कापुरहोळ, ता. भोर) या महिला श्रद्धा हॉटेलमध्ये भाकरी बनवण्याचे काम करतात. घटनेच्या दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्या कामात व्यस्त असताना त्यांची दोन वर्षांची मुलगी सुप्रिया युवराज जाधव हॉटेल परिसरात खेळत होती. यावेळी हॉटेल मॅनेजर भागवत उर्फ पप्पू मधुकर जाधव (रा. कापुरहोळ) याने निष्काळजीपणे भट्टीतील गरम राख हॉटेलसमोर टाकली. यामुळे सुप्रिया या राखेत पडली आणि तिच्या दोन्ही पायांना गंभीर भाजण्याची दुखापत झाली. या घटनेने जाधव कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, सुप्रियावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सुप्रियाच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली, ज्यावरून मॅनेजर भागवत जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.