Pune news : भोर-महाड मार्गावर बुधवार (दि.५) सकाळी वरंधा घाटातील माझेरी (ता.महाड) हद्दीतील एका धोकादायक वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात भोर तालुक्यातील शिळिंब गावातील इसमाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिळिंब (ता.भोर) येथील शिवाजी दाजी डेरे (वय ५०) हे बुधवारी सकाळच्या सुमारास महाडकडून आपल्या गावी भात कापणीसाठी दुचाकीवरून येत होते. मात्र वरंधा घाटातील माझेरी गावाच्या हद्दीतील वळणावर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते थेट दरीकडील रस्त्याच्या पट्टीवर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित वळणावर सुरक्षा दृष्टीने बॅरिगेट वा दिशादर्शक फलक नसल्याने हा अपघात घडल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यांनी प्रशासनाकडे या धोकादायक वळणावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. शिवाजी डेरे यांच्या आकस्मिक निधनाने हिरडस मावळ व शिळिंब परिसरात शोककळा पसरली आहे.