प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तिकीट दर ५० टक्के वाढविण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सात वर्षांनंतर प्रवेश शुल्कात ही वाढ करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची वाढती संख्या, नव्या प्रजातींसाठी उभारण्यात येणारी प्रदर्शने, तसेच वाढता देखभाल व विकास खर्च लक्षात घेता शुल्कात वाढ केली असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. तर या निर्णयाची अंमलबजावणी १ डिसेंबर २०२५ पासून करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.महापालिकेकडून प्राणी संग्रहालयाच्या विस्ताराचे काम सुरू असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. या विस्तारीकरणानंतर झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक या नव्या प्रजातींसाठी प्रदर्शने उभारली जात आहेत. तसेच, मॉर्मोसेट, टॅमरिंन आणि रानकुत्रा या प्रजातींसाठी खंदक केले जाणार आहे तसेच नवीन सर्पोद्यानाची उभारणी तसेच नागरिकांसाठी आधुनिक सेवासुविधा वाढविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय प्राण्यांच्या आहारासाठी, सेवकांचे वेतन, खंदक देखभाल-दुरुस्ती आणि मास्टर प्लॅननुसार विकास प्रकल्पांसाठी मोठा खर्च होत आहे. सध्या प्राणी संग्रहालयाचा वार्षिक खर्च महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असून, पुढील काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, भारतातील इतर प्राणी संग्रहालयांच्या तुलनेत पुण्यातील प्राणी संग्रहालयाचे तिकीट शुल्क कमी असल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. सुविधांचे काय ? महापालिका प्रशासनाकडून प्राणी संग्रहालयाच्या तिकिटाची दरवाढ केलेली असली तरी गेल्या चार ते पाच वर्षांत या प्राणी संग्रहालयात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नवीन प्राणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय, निधीची तरतूद नसल्याने विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे कामही रखडलेले आहे. तर पर्यटकांना या ठिकाणी कॅफेटेरिया तसेच इतर आवश्यक सुविधाही पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे महापालिकेने दरवाढ केली असली तरी दुसरीकडे संग्रहालय व्यवस्थापन तसेच पर्यटकांच्या सुविधांसाठीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच, महापालिका शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनाची सुविधा म्हणून हे प्राणी संग्रहालय चालविले जात असून, महापालिकेने त्याकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघू नये, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.