पुणे : शहरातील आवळवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री पोलिस आणि गुंडांमध्ये थरारक प्रसंग घडला. खराडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी एका गुंडाला ताब्यात घेण्यासाठी आवळवाडी फाट्यावर गेले असता, गुंडांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, खराडी तपास पथकातील अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी गुंडांच्या पायावर गोळीबार केला. या कारवाईत एक गुंड जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी गुंडाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खराडी पोलिस अधिक तपास करत असून, घटनेमागील नेमकी कारणे, सहभागी गुंडांची संख्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे बाकी आहे.