प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेची देश-विदेशात मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून, या स्पर्धेच्या माध्यमातून देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविणार आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने कामे करताना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे, सायकलपटूंना कोणताही त्रास होणार नाही, यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेच्या रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार करावी. यामध्ये दिशादर्शक फलके, मार्गाच्या दोन्ही बाजूच्या पट्टीची रंगरगोटीची कामे गतीने पूर्ण करावीत. स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता रस्त्याचे सौंदर्यीकरणाची कामे करावीत. रस्त्यांच्या बाजूला अतिक्रमण असल्यास पोलीस विभागाच्या मदतीने काढून घ्यावीत, असे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे शहरचे वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, पिंपरी-चिंचवड शहरचे वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीणचे उपधीक्षक दिलीप शिंदे, पुणे ग्रँड चॅलेज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना – पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने रस्त्यांची तपासणी करून वाहतूक नियोजन व गर्दीचे व्यवस्थापनाबाबत नियोजन करावे. – ग्रामीण भागात पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत: प्रत्यक्ष सायकलीद्वारे सुरक्षिततेच्या दृष्टीने सायकल रस्त्याची पाहणी करावी. – पोलीस विभागाने स्पर्धेकरिता आवश्यक मनुष्यबळ, वाहने, बॅरिकेटिंगची व्यवस्था करावी. – नियुक्त मनुष्यबळाचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून रंगीत तालीम पूर्ण करावी.