प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य सरकारने २०१२-२०१७ या पंचवार्षिक कालावधीसाठी राबवलेल्या १०० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची जिल्हास्तरीय समिती आता अधिकृतपणे रद्द केली आहे. या मोहिमेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आणि अभ्यासगटाने केलेल्या शिफारशीनुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या मोहिमेमध्ये किती वृक्ष लागवड करण्यात आली, याची मात्र आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. राज्यात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या काळात एकूण ५०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी १०० कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समित्यांमध्ये शासनाच्या विविध विभागांचा सहभाग होता. यामुळे समिती रद्द या पंचवार्षिक योजनेचा कालावधी २०१७ मध्येच संपुष्टात आला आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने ही समिती आता आवश्यक नसल्याची शिफारस सरकारला केली होती. योजनेचे उद्दिष्ट आणि कालावधी संपल्याने या समितीचे अस्तित्व औपचारिकरित्या संपवणे गरजेचे होते, ज्यावर आता सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.