प्रभात वृत्तसेवा पुणे – शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसाठी येत्या १५ सप्टेंबरपासन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित या शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते पाचवी साठी पेपर क्रमांक १ व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक २ ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी १० ते २३ नोव्हेंबर अशी मुदत आहे. २३ नोव्हेंबरला सकाळी १०:३० ते दुपारी १:०० या वेळेत पेपर क्रंमाक १ ची परीक्षा व पेपर क्रंमाक २ साठी दुपारी २:३० ते ५:०० या वेळेत परीक्षा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.