प्रभात वृत्तसेवा पुणे – मकर संक्रांतीच्या पहाटे सुमारे पाच वाजता, शहर अजून शांत असतानाच रमणबाग शाळा आणि लोखंडे तालीम परिसरात दररोजच्या सवयीने उघड्यावर कचरा टाकण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्या दिवशी एक वेगळाच अनुभव आला. हातात तक्रार नाही, सूचना नाही तर तिळगूळ आणि एक गोड संदेश होता. ‘तिळगूळ घ्या… आणि कचरा उघड्यावर टाकू नका.’ स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थाअंतर्गत कार्यरत कचरा वेचकांनी मकर संक्रांतीनिमित्त शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधत स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला. सवयीने उघड्यावर कचरा टाकायला येणाऱ्या नागरिकांना त्या दिवशी थांबवून, त्यांचे तोंड गोड करत, कचरा योग्य पद्धतीने देण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या पहाटेच्या उपक्रमा सोबतच कसबा पेठ परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान कचरा वेचकांनी नागरिकांना तिळगूळ वाटप करत कचरा कचरावेचकांनाच द्या, कचरा उघड्यावर टाकू नका आणि ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवा, असे संदेश दिले. सणाच्या निमित्ताने गोड शब्दांत संवाद साधत नागरिकांचा स्वच्छतेच्या प्रयत्नांमध्ये सहभाग वाढवण्याचा प्रयत्न या रॅलीतून करण्यात आला. या उपक्रमात स्वच्छ संस्थेचे समन्वयकही कचरा वेचकांसोबत उपस्थित होते. हातात तिळगूळ घ्या आणि कचरा उघड्यावर टाकू नका, असे संदेश देणारे फलक घेऊन त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली.कसबा पेठ झिरो वेस्ट, करण्याचा उपक्रम स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांनी हाती घेतला असून नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती करणे हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लक्ष्मी रोड परिसरात आता संध्याकाळीही दुकानांमधील कचरा संकलन सेवा कचरा वेचकांकडून सुरू करण्यात आली असून त्यामुळे व्यापारी परिसरात स्वच्छता राखण्याला मदत होत आहे. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून सणाचा गोडवा आणि स्वच्छतेचा संदेश एकत्रितपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.