Pune News – पुणे पोलिसांच्या अजब कार्यशैलीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकपूर्व जामिनाला दुसऱ्याच व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याच्या आधारे विरोध केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार नजरचुकीनेच झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. वारकरी संप्रदायाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी लवांडे यांच्यावर ८ मे रोजी वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी लवांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्यावर जुने गुन्हे प्रलंबित असल्याचा दावा न्यायालयात केला. २०१७ मध्ये लवांडे यांच्यावर नथुराम गोडसे यांच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल गुन्हा क्रमांक ३२/१७ दाखल झाला होता, जो शासनाने २०२२ मध्येच मागे घेतला आहे. मात्र, लवांडे यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, या हेतूने पोलिसांनी न्यायालयात ३२/१७ ऐवजी गुन्हा क्रमांक ३३/१७ सादर केला. तो गुन्हा एका दुसऱ्याच आरोपीचा होता आणि त्या गुन्ह्यातून तो आरोपी निर्दोष मुक्त झाला होता. दुसऱ्या आरोपीचा गुन्हा लवांडे यांच्या माथी मारून पोलिसांनी न्यायालयाच्या डोळ्यांत धूळ फेकल्याबद्दल लवांडे आणि त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात शपथपत्र दाखल करून पोलिसांचे पितळ उघडे पाडले. वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड आणि उपनिरीक्षक अमोल काळे यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याबाबत अर्ज केला असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणीही केली आहे. त्यावर न्यायालयाने ३० मेपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, लवांडे यांना शुक्रवारी (दि. २२) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयात हजर केले. त्या वेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.