पुणे : शहरातील मलनिःसारण वाहिन्या व चेंबरच्या सफाईसाठी महापालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग विथ वॉटर रिसायकल सिस्टिम सुविधा असलेल्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना ही वाहने देण्यात येणार असून पुणे महापालिकेला १३ गाड्या दिल्या जाणार आहेत. त्यापैकी दोन वाहने बुधवारी महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते या गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. महापालिकेच्या मलनिःसारण विभागाचे जगदीश खानोरे, संतोष तांदळे यांच्यासह आर्यन पंप्सचे उपाध्यक्ष दिनेश शिंदे यावेळी उपस्थित होते. या वाहनांमुळे तातडीच्या चेंबर सफाईसाठी महापालिकेच्या कामास गती मिळणार आहे. असे आहे वाहन : या वाहनांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यावरील पंपाच्या साहाय्याने सांडपाण्यातील गाळयुक्त पाणी शोषून घेऊन ते गाळण्याची प्रक्रिया टाकीत केली जाते आणि त्याच फिल्टर केलेल्या पाण्याचा वापर जेटिंगसाठी केला जातो. त्यामुळे फ्रेश वॉटरची गरज भासत नाही आणि इंधन, पाणी व वेळेची मोठी बचत होते. ही वाहने पावसाळ्यापूर्वीच्या प्रतिबंधात्मक देखभालीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सध्या पुणे महापालिकेकडे अशा प्रकारची ६ वाहने कार्यरत आहेत. मात्र, पुणे शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमुळे ही वाहने अपुरी ठरत आहेत. त्यामुळे मलनिःसारण विभागाच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने शासनाकडे आणखी १३ वाहनांची मागणी केली असून, ती मान्य करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही वाहने टप्प्याटप्प्याने महापालिकेला मिळणार आहेत.