पुणे : MYV इंजिनिअरिंग अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ८ डिसेंबर २०२५ रोजी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरूड येथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी व्यापक अग्निसुरक्षा आणि प्रथमोपचार जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. फाउंडेशनच्या संचालिका साविता लांगडे व योगिता जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली EHS स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना आगीचे प्रकार, फायर एक्स्टिंग्विशरचे प्रकार आणि पोर्टेबल अग्निशामक यंत्राचा योग्य वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आग कशी विझवावी हे शिकवण्यात आले. तसेच साप चावणे, भाजणे, हाड मोडणे, विषबाधा यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार कसा करावा, बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) आणि सीपीआर (CPR) कसे द्यावे याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून जीव वाचवण्याच्या प्राथमिक पद्धती शिकवण्यात आल्या. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका जयश्री जावळे, सहशिक्षक कारोटे सर, पठाण सर, खंडागळे सर, शिक्षकेतर कर्मचारी आत्राम सर, सेवक विजय बाविस्कर व सच्चीदानंद निळकंठ यांच्यासह सर्व शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम शाळेत सातत्याने राबवला जात असून यंदाचे सत्र विशेष माहितीपूर्ण व उपयुक्त ठरल्याचे शिक्षक व शिक्षकांनी सांगितले.