प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरात रविवार सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. दुपारी ढगाळ वातावरणासह पावसाच्या एक ते दोन हलक्या सरी पडल्या. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी केलेल्या नागरिकांची धादंल उडाली. पावसाने सायंकाळी काही भागात हवेत गारवा जाणवत होता. पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात प्रत्येकी एक मिमी पावसाची नोंद झाली. शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन ते तीन दिवस पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली असून, दुपारनंतरच्या पावसाने पुणेकरांची धांदल उडाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. आज दिवसभरात कुरवंडे येथे ११, निमगिरी, तळेगांव परिसरात ५ तर माळीण, लवळे आणि हवेली येथे ३ आणि चिंचवड परिसरात २ आणि पाषाण, शिवाजीनगर, बारामती आणि राजगुरूनगर येथे १ मिमी पावसाची नोंद झाली. घाटातही जोर ओसरला.. गेल्या आठवड्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. आता जिल्ह्यातील ताम्हिणी, दावडी, अंबवने घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर ओसरला. गेल्या २४ तासात ताम्हिणी आणि अंबवने घाटमाथ्यावर प्रत्येके ४५ मिमी पावसाची नोंद झाली. शिरगांव येथे ३५, वाणगांव येथे ३३, कोयना परिसरात २२, दावडी येथे २५ तर लोणावळा येथे १६ मिमी पावसाची नोंद झाली.