Pune News : महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे आता शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. स्थायी आणि अन्य समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी शहर भाजपच्या कोअर कमिटीची आज बुधवारी बैठक होत आहे. स्थायी अध्यक्षपदासाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अनिल टिंगरे, राजेंद्र शिळीमकर आदींच्या नावाची चर्चा आहे. मात्र, यातील एकाची निवड होणार की भाज धक्कातंत्र वापरणार याविषयी उत्सुकता आहे. महापौर निवडीच्या मुख्यसभेतच स्थायी तसेच अन्य विशेष समित्यांसाठी सदस्यांची नावे पक्षाच्या गटनेत्यांकडून महापौरांकडे दिली जाणार होती. मात्र, महापौर निवडीनंतर लगेचच विशेष सभा तहकूब केल्याने आता ही सभा येत्या शुक्रवारी ( दि.१३) रोजी होणार आहे. त्यामुळे त्याच दिवशी पालिकेच्या तिजोरी कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होईल. महापालिकेत सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ आणि काँग्रेसच्या १ नगरसेवकाची नियुक्ती होणार आहे. भाजपकडून अध्यक्षपदाचा दावेदार असलेल्या सदस्यांना समितीत संधी दिल्यास अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. स्थायी समितीसाठी भाजपकडून माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अनिल टिंगरे, राजेंद्र शिळीमकर, शहराध्यक्ष धीरज घाटे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, २०१७ मध्ये भाजपकडून आयत्या वेळी नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडून या पदासाठी धक्कातंत्र वापरले जावू शकते. महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपचे ११९, दोन्ही राष्ट्रवादी ३०, कॉंग्रेस १५ आणि उद्धवसेनेचे १ नगरसेवक निवडून आले आहेत. सर्वात महत्वाचे पद महापालिकेतील स्थायी ही अत्यंत महत्त्वाची समिती आहे. या समितीमध्येच सर्व आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणाऱ्यांचा पालिकेत बोलबाला असतो. पालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने ही समिती हाकत असते. स्थायी समितीमधील सदस्यांची एकूण संख्या १६ आहे. त्यानुसार पक्षीय बलाबलाचा विचार करून स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाते. १६ सदस्यांच्या समितीमध्ये भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तर काँग्रेसचा १ सदस्य असणार आहे. स्थायी समिती सदस्य झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. स्थायी समिती सदस्यांचा कालावधी दोन वर्षांचा असतो. या समितीत वर्णी लागलेल्या सदस्यांना प्रभागात सर्वाधिक निधी मिळत असल्याचे चित्र आहे. पहिल्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यास अध्यक्षांना दोन वेळा अंदाजपत्रक सादर करण्यास मिळणार आहे. त्यामुळे, पहिल्या वर्षी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. कोअर कमिटीची आज बैठक महापौर निवडीनंतर आता स्थायी समिती तसेच इतर विशेष समित्यांचे सदस्य तसेच अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज (बुधवारी) होणार आहे. त्यानंतर, ही नावे राज्याच्या नेतृत्वाकडे पाठविण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी मुख्यसभेपूर्वी ही नावे महापौर तसेच सभागृह नेत्यांकडे अंतिम कळविली जाणार आहेत. दरम्यान, महापौर, उपमहापौर निवडीनंतर महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटण्यासाठी मंगळवारी मुंबईत गेले होते. PAK vs USA : पाकिस्तानचा सलग दुसरा विजय! उस्मानच्या फिरकीसमोर अमेरिका नतमस्तक! शुभमची अर्धशतकी झुंज ठरली अपयशी