पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता चौथी, इयत्ता सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणीसाठी २ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. शासनमान्य शाळांमधून २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्जात परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी २ फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून विलंब, अतिविलंब आणि अति विशेष विलंब शुल्कासह २८फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असे राज्य परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.