Pune News : पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ रविवारी सकाळी एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून, ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून आरोपी बापू भोसले, गणेश गोरे आणि गणेश धरपाळे या तिघांनी सुरज काळे यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केली. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींच्या शोधासाठी भोर आणि वेल्हा परिसरातही पोलिसांची पथके पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस करत आहेत. हेही वाचा: Rishikesh Vaidya : ‘मी देवाचा भक्त’ म्हणत महिलेला जाळ्यात खेचले; भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा जामीन फेटाळला