Pune News : बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येविरोधात (Pune News) नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेंट्स असोसिएशन (BBPRA) आणि बाणेर बालेवाडी नागरिक मंच (BBNM) यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेकडोंच्या (Pune News) संख्येने स्थानिक नागरिक मशाल तसेच कंदील घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.गेल्या काही आठवड्यांपासून बाणेर बालेवाडी परिसरामध्ये वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही काही ठिकाणी दिवस दिवसभर वीज खंडित होत असल्यामुळे परिसरातील (Pune News) नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिसरामधील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तसेच घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीज खंडित होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगण्यात आले आहे. Pune News आयटी हबजवळ वेगाने विकसित होत असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले आणि आयटी पार्क उभे राहत असताना मूलभूत वीज सुविधा मात्र अपुऱ्या पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. परिसरात आठवड्यातून तीन ते चार वेळा वीज खंडित होणे आता नित्याचे झाले असून अनेक वेळा तासन्तास वीज पुरवठा बंद राहत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली. काही भागांमध्ये तब्बल २४ तास वीज नसल्याच्या घटनाही घडल्याचे नागरिकांनी सांगितले. सतत होणाऱ्या व्होल्टेज फ्लक्चुएशनमुळे महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असून नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले. मेट्रो कामादरम्यान भूमिगत वीज केबल्सचे वारंवार नुकसान होत असून त्यानंतर करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी परिसरातील उघड्या उच्चदाब वाहिन्या, पदपथांवर असुरक्षितरीत्या बसविण्यात आलेले फीडर पिलर बॉक्स आणि अपुऱ्या वीज पायाभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. UDCPR धोरणानंतर मोठ्या प्रमाणावर बांधकाम परवानग्या देण्यात येत असताना आवश्यक वीज नियोजन आणि लोड व्यवस्थापन करण्यात आले नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने MERC, महापारेषण आणि MSEDCL यांच्या समन्वयाने वाढत्या शहरीकरणासाठी आवश्यक वीज पायाभूत सुविधांचा व्यापक अभ्यास करावा आणि त्यानंतरच मोठ्या प्रकल्पांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४/१ मधील प्रस्तावित HV सबस्टेशनचे काम तातडीने सुरू करून प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सध्या संपूर्ण परिसर NCL आणि हिंजवडी सबस्टेशनवर अवलंबून असल्याने भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन सबस्टेशन अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. MSEDCL च्या तक्रार निवारण व्यवस्थेबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मर्यादित संसाधनांमध्ये काम करणाऱ्या स्थानिक अभियंत्यांचे आंदोलनकर्त्यांनी कौतुकही केले. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे तसेच नागरिक प्रतिनिधी, MSEDCL आणि संबंधित यंत्रणांची संयुक्त समिती स्थापन करून नियमित आढावा बैठका घ्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. “शहरांचा विकास हा केवळ उंच इमारती उभारण्यात नसून नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह मूलभूत सुविधा मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला.