कात्रज : शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या राजस्थानी समाजासाठी स्वतंत्र ‘राजस्थान भवन’ उभारण्यासाठी ४ ते ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी समस्त राजस्थानी समाज संघाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात संघाचे संस्थापक मगराज राठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. यासोबतच केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पुणे ते जोधपूर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली असून तसे पत्रही देण्यात आले आहे.त्याचबरोबर, केंद्रिय उड्डाणमंत्री केआरएमजी नायडू केंद्रिय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुणे ते उदयपूर थेट विमानसेवाही सुरु करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. राजस्थानी समाज संघाकडून देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजस्थानची कला, संस्कृती व परंपरा देश-विदेशात प्रसिद्ध असून पुणे शहरात शिक्षण, वैद्यकीय उपचार व व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर राजस्थानी समाज वास्तव्यास आहे. पुण्यात सध्या अंदाजे १७ ते १८ लाख राजस्थानी समाजाची लोकसंख्या असूनही येथे अद्याप कोणतेही अधिकृत ‘राजस्थान भवन’ किंवा विश्रामगृह उपलब्ध नाही. राजस्थानी समाजातील विद्यार्थी तसेच उपचारासाठी पुण्यात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना निवासाच्या गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पुण्यातील योग्य ठिकाणी ४ ते ५ एकर जागा उपलब्ध करून दिल्यास, राजस्थान भवनाचे बांधकाम जनसहयोगातून करण्यास संघ पूर्णतः तयार आहे. तसेच, रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्यास आणि थेट विमानसेवा सुरु केल्यास दळणवळणासाठी फायदा होईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. या निवेदनाच्या प्रती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही देण्यात आल्या आहेत.