पुणे – गुलटेकडीतील टीएमव्ही कॉलनीत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून अनावश्यक हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला थेट सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधीत कर्मचार्याची नियुक्ती मुख्यालयात आहे. मात्र, स्वारगेट येथील पाडकाम प्रकरणात त्याची उपस्थिती अन् हस्तक्षेप आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. समीर जगन्नाथ थोरात (नेमणूक – पोलीस मुख्यालय) असे निलंबीत पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. मुकुंदनगर लगतच्या गुलटेकडी परिसरातील टीएमव्ही कॉलनीत तक्रारदार ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा दोन मजली बंगला आहे. या जागेबाबत बिल्डर देवेश जैन यांच्याशी व्यवहार झाला होता. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्यापुर्वीच बिल्डरने जबरदस्तीने घराबाहेरील भिंतीचे पाडकाम केले. याप्रकरणी बिल्डर जैन यांच्यासह चौघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता याच प्रकरणात मुख्यालयातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याला निलंबीत करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी थोरात घटनास्थळी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. थोरात यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असतानाही ते स्वारगेट परिसरात सुरू असलेल्या पाडकामावेळी तिथे हजर होते. या प्रकरणात त्यांचा अनावश्यक हस्तक्षेप आढळून आला आहे. याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहीते यांच्या कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यालयाच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले.