प्रभात वृत्तसेवा पुणे – पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर पेट्रोलपंप बंद ठेवणार असल्याचा इशारा ऑल इंडिया पेट्रोल ड्रीलर्स असोसिएशनने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आश्वासन दिल्यानंतर मागे घेतला आहे. संबंधित पेट्रोल पंपांना संरक्षण देणार आणि मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींना दिले आहे. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष अमानुल्ला खान, राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी पोलीस आयुक्त अमितेशजी कुमार यांची बुधवारी भेट घेतली. त्यावेळी गुन्हेगारी वाढलेल्या आणि ज्या पेट्रोलपंपावर हा प्रकार घडला त्या पंपावर तात्काळ पोलीस मदत देण्याचे आश्वासन दिल्याचे दारूवाला यांनी सांगितले. त्यामुळेच सायंकाळी सात वाजल्यानंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय रहीत केल्याचेही ते म्हणाले. काही दिवसांपासून पुण्यात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसोबत मारामारी करण्याचे प्रकार वाढले आहेत. भैरोबानाला, पूलगेट आणि येरवडा येथील परिसरात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी असोसिएशन आणि पंपावरील कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे दिली. त्यावर आयुक्तांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे.