प्रभात वृत्तसेवा पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प ३ साठी महापालिकेकडून ४ ठिकाणी पार्किंगची सेवा विकसित करून दिली जाणार आहे. या मार्गावर प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी पीएमआरडीएकडून ८ जागांची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यातील चार जागा देण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. मात्र, या जागांच्या ठिकाणी महापालिकाच पार्किंग विकसित करणार असून, ते कोणी चालवायचे, याचा निर्णय मेट्रोसोबत करार झाल्यानंतर घेतला जाणार आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी ही माहिती दिली. मेट्रो ३ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत असून, दोन ते तीन महिन्यांत हिंजवडी ते बाणेर मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील वर्षभरात हा पूर्ण मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी पीएमआरडीएकडून ८ जागांची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यावर चर्चा करून महापालिकेने तूर्तास चार जागा देण्यास मान्यता दिली आहे. या जागांमध्ये बालेवाडी अमर टेक पार्कजवळ, बालेवाडी आयरिस सोसायटीजवळ, बाणेर काॅसमाॅस सोसायटीजवळ, तसेच बाणेर येथेच एबीझेच्या जवळ या जागा आहेत. या जागा स्थानकापासून २०० ते ४०० मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. महापालिकाच घेणार भाडे.. या जागा मेट्रोला न देता त्या ठिकाणी महापालिकाच पार्किंगची सोय विकसित करणार आहे. सहा महिन्यांपूर्वी महापालिकेत झालेल्या बैठकीत या जागा पालिकेनेच विकसित करून हे पार्किंग महापालिकेनेच चालवायचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेकडून या जागा विकसित केल्या जाणार असल्या, तरी हे पार्किंग कोण चालविणार, हे निश्चित केलेले नाही. त्यासाठी या दोन्ही विभागांत बैठक घेऊन जागांबाबत करार करतानाच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, पार्किंगचे दर महापालिका निश्चित करणार असून, ते मेट्रोला चालवायला दिले तर त्याचे भाडे महापालिका घेणार असल्याचेही सांगण्यात आले.