पुणे : पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीईआरएफ) तर्फे आयोजित पीसीईआरएफ – कुमार बेहरे कन्स्ट्रक्शन सेफ्टी अवॉर्ड्स २०२५ या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या मालिकेतील १२ वी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला कुमार बेहरे ग्रुप सहकार्य करीत आहे. पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर आयोजित ओरिएंटेशन मीटिंग शनिवारी, १ नोव्हेंबर रोजी पुण्यात यशस्वीरित्या पार पडली. बैठकीत पीसीईआरएफचे अध्यक्ष नरेंद्र कोठारी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सुरक्षा पुरस्कारांचे संयोजक रामनाथ भट यांनी पुरस्कारांचा हेतू आणि उद्दिष्टे यांबद्दल प्रास्ताविक केले, तर सह-संयोजक सतीशकुमार नायर यांनी पुरस्कार प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. या ओरिएंटेशन मीटिंगमध्ये सुरक्षा पुरस्कारांचे ज्युरी सदस्य, संयोजक, सह-संयोजक तसेच पीसीईआरएफचे पदाधिकारी उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा मानके उंचावण्यासाठी आणि उत्कृष्ट सुरक्षा पद्धती ओळखण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. बैठकीत सुरक्षेची उद्दिष्टे, मूल्यांकन निकष आणि सुरक्षा संस्कृतीचे महत्त्व यावर सखोल चर्चा झाली. कार्यक्रमात विविध नामांकित बांधकाम कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारे ८० हून अधिक सुरक्षा अधिकारी व अभियंते उपस्थित होते. या बैठकीद्वारे सहभागी संस्थांना त्यांच्या प्रकल्पांमध्ये सुरक्षा मानके अधिक मजबूत करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. पीसीईआरएफ – कुमार बेहरे सुरक्षा पुरस्कार बांधकाम क्षेत्रात सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करणाऱ्या कंपन्यांना गौरविणारे हे राज्यातील सर्वात प्रतिष्ठित मानांकन मानले जाते.