प्रभात वृत्तसेवा पुणे – निसर्गोपचार, आयुर्वेद, पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती, जीवनमूल्यांचा अंगीकार केल्यास स्वस्थ भारत बनू शकतो, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. यासाठी निसर्गोपचार वैद्यक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आठव्या निसर्गोपचार दिनी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणेचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंग उपस्थित होते.बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सर, हृदयरोग, किडनी, मधुमेह आदी आजार जडले आहेत. त्यापासून दूर राहायचे असेल, तर निसर्गोपचार आणि नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक असून, आपले अन्नसेवन शुद्ध असल्याशिवाय उपचार लाभदायी होणार नाहीत, असेही राज्यपाल म्हणाले.राज्यमंत्री जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. अमरेंद्रकुमार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी निसर्गोपचाराशी संबंधित पुस्तकांचे आणि विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.