पुणे – ऊरळीकांचन येथील महात्मा गांधी निसर्गोपचार केंद्रात दि.१८ नोव्हेंबर रोजी आठवा ‘राष्ट्रीय निसर्गोपचार दिन’ साजरा करण्यात आला. इंडियन नॅचरोपॅथी अँड योगा ग्रॅज्युएट्स मेडिकल असोसिएशन ने या दिनाचे आयोजन केले होते. १८ नोव्हेंबर या दिवशी १९४५ साली महात्म्य गांधींनी राष्ट्रीय निसर्गोपचार फेडरेशनची स्थापना केली होती. या दिवसाचे औचित्य म्हणून राष्ट्रीय निसर्गोपचार दिन देशभर साजरा केला जातो. ग्रामीण जनजागृती शिबिर तसेच आंतरशालेय पोस्टर आणि क्विझ स्पर्धा या निमित्ताने घेण्यात आल्या. अँटी-ओबेसिटी ड्राइव्ह अंतर्गत ‘स्वस्थ महाराष्ट्र अभियान’ ही या निमित्त राबविण्यात आले असून असोसिएशनतर्फे “निसर्गोपचाराद्वारे स्थूलत्व व्यवस्थापन” या विषयावर व्यापक जनजागृती वर्षभर करण्यात येत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, हृदयरोग यांसारख्या व्याधींवर प्रतिबंध करण्यासाठी नैसर्गिक आणि शाश्वत उपायांविषयी मार्गदर्शन केले जात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभिषेक देविकार यांनी सांगितले. या महत्वपूर्ण उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष शुभेच्छापत्रे पाठवून सक्रिय पाठिंबा व्यक्त केला आहे. राज्यातील विविध रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि शैक्षणिक केंद्रांसोबत सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न आयोजक वर्षभर करणार असून या अभियानातून महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक आणि मोजता येण्याजोगा परिणाम साधणे हे असोसिएशनचे उद्दिष्ट आहे.