प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरात रक्ताचा तुटवडा गंभीर होत असताना पुणेकरांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण दाखविले. खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ५६ रक्तदान शिबिरांमधून तब्बल १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले. दरवर्षीच्या या महाअभियानाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मोहोळ म्हणाले, की पुणेकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. समाजाच्या सर्व स्तरांतून मिळालेला सहभाग माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. शहराने पुन्हा एकदा दाखवून दिले, की ऐक्य, सहकार्य आणि सामाजिक संवेदनशीलता हीच त्याची खरी ओळख आहे. हजारो पुणेकरांनी घराबाहेर पडून केलेले रक्तदान हे केवळ वाढदिवसाचे औचित्य नव्हते, तर समाजबंध दृढ करणारे प्रतीक होते. मोहोळ यांनी सांगितले की, आपत्कालीन प्रसंगी तत्काळ रक्त उपलब्ध करून देता यावे, यासाठी पुणेकरांची एक स्वतंत्र सूची तयार करण्याचे काम सुरू आहे. या यादीत विशेषतः दुर्मिळ रक्तगट असलेल्या दात्यांचा समावेश केला जाणार असून, त्याचा थेट लाभ गरजू रुग्णांना मिळणार आहे. रक्तदाते आणि रुग्ण यांच्यासाठी एक विशेष ऑनलाइन पोर्टल विकसित केले जात आहे. रक्त देण्यास इच्छुक नागरिक या पोर्टलवर नोंदणी करू शकतील, तसेच गरज पडल्यास रुग्ण किंवा रुग्णालयांकडून याच प्लॅटफॉर्मवरून दात्यांशी थेट संपर्क साधता येईल. त्यामुळे रक्त मिळविण्यासाठी रुग्णांना दवाखान्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर धावाधाव करावी लागणार नाही. असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.