पुणे : बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे 15 वर्षीय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने व कोयत्याने बावीस वार करून तिचा निर्घृण खून करणा-याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. घटनेनंतर चार वर्षांनी मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. शुभम उर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली होती. आरोपीने मुलीचा गळा चिरून तिचं धड शरीरापासून वेगळं करून निर्घृण खून केला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी अशा क्रूर व्यक्तीला कोणतीही दयामाया न दाखविता आरोपीला फाशीची शिक्षा योग्य राहील व ही शिक्षा संपूर्ण समाजाला एक वेगळा आदर्श घालून देईल. त्यामुळे आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. साक्षीदारांनी दिलेली साक्ष व उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचे न्यायनिवाडे सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालय सादर करण्यात आले होते. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला. हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांच्या श्रेणीत येईल असे मानणे कठीण होईल. पण सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा क्रूर होता. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीच्या मृतदेहावर २५ छेदलेल्या जखमा आढळल्या. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत आरोपी दोषी आढळला आहे. या गुन्ह्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अशा दोनच तरतुदी आहेत. जन्मठेप हा नियम आहे आणि मृत्युदंड हा अपवाद आहे. मृत्युदंडाची शिक्षा देऊन हे अपवादात्मक प्रकरण म्हणून घोषित होणे हे माझ्या न्यायिक मनाला पटत नाही. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा ही आरोपीसाठी योग्य शिक्षा आहे असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली. त्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहोत. या निकालामुळे समाजामधील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. ॲड. हेमंत झंजाड, विशेष सरकारी वकील