पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियानाअंतर्गत व्याख्यान व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या राबविण्यात आले. डॉ.आंबेडकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम बनसोडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन पुणे जिल्हा न्यायालयातील ॲड.अश्विनी बोगम यांनी महिलांविषयी असणारे कायद्यांबाबत सविस्तर चर्चा करुन महिलांनी सामाजिक माध्यमे वापरत असताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केले. ईरा एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. डॉ. समीना पठाण यांनी महिला सक्षमीकरण याविषयी विद्यार्थींनींना मार्गदर्शन केले. सलमान चौधरी यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराद्वारे विद्यार्थींनीमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हा उपक्रम विद्यार्थीनींच्या सुरक्षितता, जागरूकता व निर्भयतेच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या समन्वयक व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मंजुषा निगडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. रिमा खरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. श्रेयसी परब यांनी करुन दिला. आभार प्रा. अविनाश तायडे यांनी मानले.