Pune News – काँग्रेस पक्षाने पक्ष संघटना मजबूत करणे, तसेच पक्षाची वाढ करण्यासाठी दोन शहराध्यक्षांची निवड केली आहे. त्यात शहराच्या पश्चिम भागासाठी माजी आमदार दीप्ती चवधरी यांना, तर पूर्व भागासाठी प्रशांत जगताप यांना संधी दिली आहे. मात्र, मात्र, या निवडीवरून आता मानापमान नाट्य सुरू झाले आहे. या निवडीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी विद्यमान अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शहराचा पदभार चवधरी यांच्याकडे दिला होता. त्या वेळी प्रशांत जगताप यांनी पदभार घेतला नाही. मात्र, आता उद्या (शनिवारी) हे दोन्ही शहराध्यक्ष माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पदग्रहण करणार आहेत. त्यामुळे हा सोहळा होणार असताना दोन दिवस आधीच चवधरी यांच्याकडे पदभार का दिला, यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. कोणीही करा पण एकच असू द्या…! महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला केवळ ३ नगरसेवक निवडून आणता आले, तर शिवसेनेचा एकच नगरसेवक निवडून आला. याउलट काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. असे असतानाही पक्षाने शहराच्या संघटनेत बदल केले. त्या वेळी पक्षाच्या नेत्यांनी सर्वांशी चर्चा केली. त्यात अनेकांनी कोणालाही पद द्या. मात्र, एकच शहराध्यक्ष ठेवा, अशी भूमिका मांडली. मात्र, त्यालाही विरोध झाला. पक्षात अंतर्गत वाद नको म्हणून दोन शहराध्यक्ष नेमले, तरी त्यावरूनही खदखद सुरू झाली असून, पदभारापासूनच वादाला सुरुवात झाली आहे.