प्रभात वृत्तसेवा पुणे – ढोले-पाटील रस्त्यावर रूबी हॉस्पिटलजवळ हाॅटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीच्या ढिगाऱ्या खालून त्यांना बाहेर काढले. दोघे जखमी असून, उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चर्चा दिवसभर शहरात होती.रुबी हाॅल हाॅस्पिटलशेजारी एका हाॅटेलचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. भिंत पाडण्याचे काम ठेकेदारामार्फत करण्यात येत होते. स्लॅब पाडण्याच्या कामासाठी मजूर अड्ड्याहून मजूर आणून त्यांच्याकडून हे काम करून घेण्यात येत होते. त्याचवेळी स्लॅबचा काही भाग मजुरांच्या अंगावर कोसळला. एकाच्या पायाला गंभीर दुखापत तर दुसऱ्याच्या अंगावर स्लॅब होता. घटनास्थळी पोहोचताच अग्निशामक जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दलाकडील स्प्रेडर, कटर इत्यादी रेस्क्यू उपकरणाचा वापर केला. त्यावेळी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे रस्त्यावर खोदाईचे काम सुरू होते. पालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिकांनी त्या कामावरील ब्रेकर मशिन आणून स्लॅब तोडला व रस्सीच्या साहाय्याने अडकलेल्या मजुराची सुटका केली. त्यांना तत्परतेने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. सचिन चव्हाण (येरवडा) व कृष्णा (येरवडा) अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, प्रभाकर उम्राटकर, प्रशांत गायकर तसेच वाहन चालक राजू ओव्हाळ, अनिकेत ओव्हाळ, आकाश दुबळे व तांडेल भाऊसाहेब चोरमले, संदीप रणदिवे आणि फायरमन भालचंद्र गव्हाणकर गणेश मोरे, अल्पेश कोंडे, नवनाथ शेडगे, गणेश लोणारे, सुरेश पवार, प्रतीक कुंभार, मयूर चव्हाण यांनी सहभाग घेतला. नायडू व कसबा अग्निशमन केंद्र आणि मुख्यालयातील एक रेस्क्यू व्हॅन अशा एकूण ३ गाड्या घटनस्थळी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच परिमंडळ १ चे उपायुक्त माधव जगताप घटनास्थळी हजर होते.