पुणे – त्रास देण्याच्या हेतूने पतीसह त्याच्या कुटुंबिया विरुद्ध विविध ठिकाणी दावा दाखल करणार्या पत्नीला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. तिने दाखल केलेले तीन्ही दाव्यांची सुनावणी पुण्यामध्ये एकत्रीत व्हावी यासाठी पतीने दाखल केलेला अर्ज मुंजूर करत पतीला दिलासा दिला. रोम आणि रोमा (दोघांची नावे बदलेली आहेत) विवाहानंतर कुटुंबियांसह पुण्यात राहत होते. ते घर पतीच्या वडिलांच्या नावे होते. सुरूवातीचे काही दिवस दोघांचा संसार सुरळीत होता. मात्र, त्यानंतर त्यांच्यात सतत खटके उडू लागले. सततच्या वादाला कंटाळून ती माहेरी निघून गेली. एक दिवस अचानक ती पुण्यातील घरी आली आणि जबरदस्तीने घरात घुसून पती आणि कुटुंबियांना धमक्या दिल्या. भीतीपोटी पती आणि त्याच्या कुटुंबियांनी राहते घर सोडले. त्याने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर तीने पती, सासू-सासरे, नणंद आणि आजी सासू विरुद्ध फिर्याद दाखल केली. पुण्यात वास्तव्यास असताना देखील तीने सासरच्या मंडळीला त्रास देण्याच्या हेतूने पती आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध राहाता येथे नांदण्यास घेऊन जाण्यासाठी अर्ज दाखल केला. तर, कोपरगाव येथे कौटुंबिक हिंसाचार आणि पोटगीचा दावा दाखल केला. या तीन्ही दाव्यांत तो वकीलांमार्फत हजर झाला. त्यानंतर त्याने अॅड. अमोल जगताप, अॅड. अमित राठी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. तिन्ही दावे पुणे येथे स्थलांतरित करण्याच मागणी केली. त्यानुसार तीन्ही दावे पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात पाठविण्याबाबत आदेश उच्च न्यायालयाने दिला. अॅड. जगताप, अॅड. राठी यांना अॅड. अविनाश पवार यांनी सहकार्य केले. पतीसह त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्याच्या हेतूने पत्नीने वेगवेगळ्या ठिकाणी तीन दावे दाखल होते. मात्र, पत्नी पुण्यात वास्तव्यास आहे. त्यामुळे तिन्ही दावे येथे वर्ग करण्यासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने मंजुर केला. – अॅड. अमित राठी, पतीचे वकील