प्रभात वृत्तसेवा पुणे – जिल्ह्यातील देवस्थान, वतन, आदिवासी, शासनाने कब्जेहक्काने अथवा भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीची तपासणी तहसीलदार यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. अटी-शर्तीनुसार त्यांचा वापर सुरू आहे का, की शर्तभंग झाला आहे, यांची तपासणी होणार आहे.मुंढवा येथील बॉटेनिकल गार्डनची जागा, बोपोडी येथील कृषी विभागाची, तर ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागच्या जागेच्या व्यवहार संदर्भातील गैरप्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या काही वर्षांत जमिनीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे परवानगी न घेताच अशा जमिनीचे व्यवहार केले जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात अशा सर्व जमिनींची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत.वर्ग दोनच्या जागेची तपासणी ही जागेवर प्रत्यक्ष जाऊन केली केली जाणार आहे. तपासणीमध्ये ज्या साली ही जागा शासनाकडून देण्यात आली आहे. ती देताना कोणत्या अटी-शर्ती शर्ती घालण्यात आल्या होत्या. त्या अटी-शर्तीनुसार जागेचा वापर होतो आहे का की अन्य वापर सुरू आहे, ती भाड्याने त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आली आहे का, जागेची परस्पर व्यवहार झाला आहे का, अशा सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष जागेवर पंचनामे करण्यात येणार आहेत.